शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत एकाच रात्रीत दोन गावांमध्ये तब्बल चार धाडसी घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आमोदे गावात एक तर बलकुवे गावात सलग तीन घरफोड्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत घरफोड्या केल्या. चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांपासून तालुक्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अनेक प्रकरणांचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्यातच पुन्हा एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















