धुळे प्रतिनिधी महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीसह नाताळ व ३१ डिसेंबर २०२५ च्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्रीवर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत बनावट देशी व विदेशी मद्य निर्मितीचा मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल ₹३६,५६,४७०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक आरोपी अटकेत घेण्यात आला आहे.ही कारवाई मा. श्री. राजेश देशमुख साहेब (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई), मा. श्री. प्रसाद सुर्वे साहेब (सहआयुक्त – अंमलबजावणी व दक्षता), मा. श्रीमती यु. आर. वर्मा मॅडम (विभागीय उपायुक्त, नाशिक विभाग) तसेच श्रीमती स्वाती काकडे मॅडम (अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, धुळे) यांच्या आदेशानुसार राबविण्यात आली. गुप्त बातमीवरून छापा दुय्यम निरीक्षक श्री. ए. व्ही. भडागे (बीट क्र. २, ता. जि. धुळे) यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे देवभाने शिवार, मुंबई–आग्रा महामार्गालगत असलेल्या अँग्रो टेकनर्स फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या पत्री शेडवर छापा टाकण्यात आला.छाप्यादरम्यान सदर शेडमध्ये कंपनीच्या नावाखाली बनावट देशी व विदेशी मद्य, तयार देशी ब्लेंड तसेच मद्यनिर्मितीसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवलेले आढळून आले.
बनावट दारूने भरलेली चारचाकी जप्त
कारवाईदरम्यान मारुती सुझुकी इक्को (MH-48-AT-0841) ही चारचाकी गाडी पूर्णपणे बनावट दारूने भरलेली आढळून आली. सदर वाहनासह सर्व बनावट मद्य व साहित्य असा एकूण ₹३६,५६,४७०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एक आरोपी अटकेत; गंभीर कलमान्वये गुन्हा दाखलया प्रकरणी प्रफुल्ल दिनकर भोई (रा. तपासाधीन) या आरोपीस अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध १६/१२/२०२५ रोजी विविध नोंद करण्यात आला आहे.
संयुक्त पथकाची उल्लेखनीय कामगिरी
ही धडक कारवाई निरीक्षक श्री. आर. आर. धनवटे, निरीक्षक बी. व्ही. हिप्परगेकर (भरारी पथक), दुय्यम निरीक्षक श्रीमती शुभांगी मोरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक जे. बी. फुलपगारे यांच्यासह जवान दारासिंग पावरा, हेमंत पाटील, अमोल धनगर, नितीन पाटील, सुरेश शिरसाळे, गौरव सपके, मनोज धुळेकर, मयूर मोरे, बाळकृष्ण सोनवणे, कल्पेश शेलार, वाहनचालक श्री. निलेश मोरे व श्रीमती भाग्यश्री पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
अवैध मद्याविरोधात कडक इशारा
निवडणूक कालावधी व सणासुदीच्या काळात अवैध मद्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई तीव्र केल्याचे स्पष्ट झाले आहे. पुढील काळातही अशा अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात कडक व सातत्यपूर्ण कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















