शिंदखेडा | प्रतिनिधी
शिंदखेडा पोलिस स्टेशनच्या अत्यंत सतर्क व जलद कारवाईमुळे State Bank of India च्या एटीएममधील तब्बल ₹९,६९,०००/- इतक्या मोठ्या रकमेची चोरी ऐनवेळी टळली. मध्यरात्रीच्या सुमारास मिळालेल्या अलर्टवर अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचत पोलिसांनी चोरांचा डाव उधळून लावला. या घटनेमुळे शिंदखेडा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
अलर्टमुळे उघडकीस आली घटना
आज पहाटे सुमारे २.३० वाजता, SIS सिक्युरिटी कॅश मॅनेजमेंट सिस्टम या कंपनीकडून गुरगाव येथून शिंदखेडा पोलिसांना तातडीचा कॉल आला. Shindkheda जवळील एसबीआय एटीएममध्ये छेडछाड झाल्याचा तांत्रिक अलर्ट प्रणालीद्वारे प्राप्त झाला होता.
४–५ मिनिटांत पोलिस घटनास्थळी
त्याच वेळी पीएसआय ठाकरे व शिंदखेडा पोलिसांचा गस्त पथक परिसरातच रात्र गस्त घालत होते. माहिती मिळताच पेट्रोलिंग व्हॅन तत्काळ घटनास्थळी रवाना झाली. पोलिसांची चाहूल लागताच एटीएम उखडण्याचा प्रयत्न करणारे अज्ञात चोरटे एटीएम तिथेच सोडून पळून गेले.
दोरीने एटीएम उखडण्याचा प्रयत्न
प्राथमिक तपासात चोरांनी ब्लॅक रंगाची बोलेरो पिकअप व्हॅन वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. दोरीच्या सहाय्याने संपूर्ण एटीएम मशीन गाडीला बांधून उखडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे एटीएममधील संपूर्ण रक्कम सुरक्षित असल्याची अधिकृत माहिती आहे.
नाकाबंदी, सीसीटीव्ही व फॉरेन्सिक तपास सुरू
घटनेनंतर शिंदखेडा परिसरात तसेच लगतच्या मार्गांवर कडक नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रकरणाची माहिती संपूर्ण रेंजसह मध्यप्रदेश व गुजरात पोलिसांना देण्यात आली आहे.
एटीएम परिसरातील तसेच टोल नाक्यांवरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, फॉरेन्सिक पथक घटनास्थळी तपास करत आहे. संशयित वाहनाच्या हालचालींचा माग काढण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
शिंदखेडा पोलिसांचे कौतुक
अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचून मोठी चोरी रोखल्याबद्दल शिंदखेडा पोलिसांच्या तत्परतेचे व सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांविषयी विश्वास अधिक दृढ झाला आहे.
— पुढील तपास शिंदखेडा पोलिस स्टेशनकडून सुरू आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















