शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील नागरिकांच्या हक्कासाठी आणि विविध प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी शिरपूर फर्स्टच्या वतीने भव्य “जनसंघर्ष यात्रा २०२६” चे आयोजन करण्यात आले आहे. दि. २३ मे ते २८ मे २०२६ दरम्यान होणारी ही यात्रा तालुक्यातील गावागावात जाऊन जनतेशी थेट संवाद साधणार आहे.
“तुमचा प्रश्न… आमचा संघर्ष..!” हा संदेश घेऊन निघणाऱ्या या यात्रेत शेतकरी, विद्यार्थी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
शिरपूर फर्स्ट ही सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारी क्रांतिकारी चळवळ म्हणून ओळखली जाते. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आंदोलन, निवेदन आणि पाठपुराव्याच्या माध्यमातून संघटनेने अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. तसेच रस्ते, पाणी आणि मूलभूत सुविधांसाठीही विविध ठिकाणी प्रभावी आंदोलने करण्यात आली आहेत.
या यात्रेदरम्यान रस्ता, पाणी, आरोग्य, रेशन, शासकीय योजना, विद्यार्थ्यांच्या अडचणी, व्यसनमुक्ती, लाडकी बहीण योजनेतील समस्या यांसारख्या विषयांवर नागरिकांशी संवाद साधण्यात येणार आहे. गावागावातील प्रश्न प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर प्रशासन स्तरावर पाठपुरावा करण्याचा यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
यात्रेचा शुभारंभ दि. २३ मे २०२६ रोजी खर्दे येथील दत्तप्रभू मंदिरापासून होणार असून, दि. २८ मे २०२६ रोजी खंडेराव मंदिर, शिरपूर येथे यात्रेचा समारोप करण्यात येणार आहे.
जनसंघर्ष यात्रेचा मार्ग :
२३ मे : खर्दे, उंटावद, सावळदे, कुरखळी, थाळनेर
२४ मे : विखरण, टेकवाडे, तरहाडी, भटाणे
२५ मे : ताजपुरी, गरताड, अहिल्यापूर, होळनांथे, हिसाळे, बाभळाज
२६ मे : हिंगोणी, बाळदे, वानावळ, जातोडा
२७ मे : सुळे, चिलारे, हाडाखेड, दहीवद
२८ मे : शिरपूर शहरातील विविध भाग
या यात्रेसाठी रविंद्र भिल यांची संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, चैतन्यसिंह जमादार व प्रणव भामरे हे सहसंयोजक म्हणून काम पाहणार आहेत. तर रामेश्वर पावरा यांच्याकडे नियंत्रक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख पार्थ राजपूत यांनी दिली.
शिरपूर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या प्रश्नांना आवाज द्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















