शिरपुर | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना अनेक पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचारी अभावी पोलिसांची अक्षरशः दमछाक होत आहे. कुठे एकाच कर्मचाऱ्यावर तीन-तीन जबाबदाऱ्या, तर कुठे ठाणेदार मनुष्यबळासाठी वरिष्ठांकडे विनवण्या करताना दिसतात. पण या सगळ्या गोंधळात सांगवी पोलीस ठाणे मात्र “व्हीआयपी झोन” ठरत असल्याची जोरदार चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.
“अजब तुझा कारभार, सांगवी सरकार..!”
सांगवी पोलीस ठाण्यासाठी मंजूर गाड्या अवघ्या दोन… पण चालक तब्बल पाच!
म्हणजे एका गाडीमागे अडीच ड्रायव्हर… हा प्रकार पाहून सामान्य माणूसच नव्हे तर पोलीस विभागातील कर्मचारीही आश्चर्य व्यक्त करत आहेत.
जिल्ह्यातील इतर ठाण्यांत वाहन चालवायला कर्मचारी मिळत नाहीत, तर सांगवीत एवढी “सुविधा” कुणाच्या आशीर्वादाने?
१५ अतिरिक्त कर्मचारी… नेमकं कारण काय?
माहितीनुसार सांगवी पोलीस ठाण्यात मंजूर पदांपेक्षा तब्बल १५ कर्मचारी अधिक कार्यरत असल्याची चर्चा आहे.
बाकी ठिकाणी कर्मचारी अपुरे असल्याने रात्रंदिवस ड्युटी करणाऱ्या पोलिसांची अवस्था बिकट झाली आहे, तर सांगवीत मात्र अतिरिक्त फौज तैनात असल्याचं चित्र दिसत आहे.
यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय — हे विशेष प्रेम नेमकं कुणासाठी?
कुणाच्या शिफारशीवर या पोस्टिंग्ज झाल्या?
जिल्ह्यातील इतर ठाण्यांवर अन्याय करून सांगवीवरच एवढी “मेहेरबानी” का?
महिला सुरक्षेचं काय?
एका बाजूला महिला अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार आणि विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला महिला पोलिसांची कमतरता गंभीर ठरत आहे.
१५ अतिरिक्त कर्मचारी ठेवायला जागा आहे, पण पीडित महिलांसाठी पुरेशा महिला पोलिसांची नियुक्ती का नाही? असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.
“जनतेच्या पैशावर हा कारभार किती दिवस?”
जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचारी आणि साधनसामग्रीचा तुटवडा असताना सांगवी ठाण्यातील अतिरिक्त व्यवस्थेवर आता उघडपणे चर्चा सुरू झाली आहे.
समान वाटपाऐवजी काही ठाण्यांना “विशेष वागणूक” दिली जात असल्याची भावना पोलीस दलातच वाढताना दिसत आहे.
एसपी साहेब, आता तरी लक्ष द्या..!
सांगवी पोलीस ठाण्यातील अतिरिक्त मनुष्यबळ, चालकांची संख्या आणि महिला पोलिसांचा अभाव याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी आता नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
अन्यथा “लाडक्या ठाण्या”ची चर्चा जिल्हाभर आणखी रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















