शिरपूर (प्रतिनिधी) – ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांच्या महसूल विभागाशी संबंधित समस्या तत्काळ सोडवून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यातील कोडीद येथे गुरुवार (दि.१२ मार्च २०२६) रोजी मंडळस्तरीय समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि.१८ फेब्रुवारी २०२६ च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील नागरिकांना प्रशासनाच्या सेवा त्यांच्या गावाजवळच उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मंडळ स्तरावर समाधान शिबिरे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार धुळे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते तसेच उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक (शिरपूर) यांच्या मार्गदर्शनाखाली कोडीद येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान – टप्पा १’ अंतर्गत हे शिबिर पार पडले.
या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार महेंद्र माळी (शिरपूर) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सतार सिंग पावरा, विष्णू भाबड (उपअधीक्षक, भूमी अभिलेख शिरपूर) तसेच तहसील कार्यालयातील विविध शाखांचे अधिकारी-कर्मचारी, कोडीद मंडळातील सरपंच, उपसरपंच, मंडळ अधिकारी, तलाठी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विविध विभागांमार्फत नागरिकांना त्वरित सेवा
समाधान शिबिरात विविध विभागांचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते. नागरिकांनी या स्टॉलना भेट देत शासनाच्या योजनांची माहिती घेतली व आवश्यक कागदपत्रे तत्काळ मिळवली. शिबिरात खालीलप्रमाणे लाभ वितरित करण्यात आले –
• सेतू शाखा – उत्पन्न दाखले व डोमिसाईल दाखले : १९३
• संजय गांधी शाखा – मंजूर प्रकरणांचे वाटपपत्र : ५०
• पुरवठा विभाग – नवीन व दुबार शिधापत्रिका वाटप : ७५
• ७/१२ उतारे व ८ अ उतारे वाटप : ४९
• भूमी अभिलेख विभाग – मालमत्ता पत्रक सनद व माहितीपत्रके : ५
• ट्रॅक्टर कृषी कर्ज संबंधित प्रकरणे : ५
• ७/१२ दुरुस्ती प्रकरणे : १२
• जन्म दाखले : १५
या शिबिरात एकूण ४०४ लाभार्थींनी उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला, तसेच शासनाच्या विविध सेवा आणि योजनांची माहिती प्रत्यक्ष स्टॉलला भेट देऊन जाणून घेतली.
प्रशासन नागरिकांच्या दारी
यावेळी अध्यक्षीय भाषणात तहसीलदार महेंद्र माळी यांनी सांगितले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचवणे आणि नागरिकांच्या समस्या त्वरित सोडवणे हा आहे. या शिबिरांचा लाभ कोडीद मंडळातील सर्व शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांनी घ्यावा,’ असे आवाहन त्यांनी केले.
तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे विशेष परिश्रम
सदर समाधान शिबिर यशस्वी पार पाडण्यासाठी कोडीद मंडळातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वयातून मोठ्या प्रमाणात नागरिकांना शासनाच्या सेवा थेट मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवा त्यांच्या गावाजवळ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेले हे समाधान शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले असल्याचे मत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केले.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















