शिरपूर (प्रतिनिधी) – समाजातील कर्तृत्ववान महिलांना प्रेरणा देणारा आणि महिला सन्मानाचा संदेश देणारा एक प्रेरणादायी कार्यक्रम शिरपूर शहरात पार पडला. कुरखळी येथील सेवाभावी ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून महिला शक्तीला सलाम करण्यात आला.
दिनांक ७ मार्च रोजी शिरपूर येथील हॉटेल साईस्वाद येथे आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांना शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कुरखळी सारख्या छोट्याशा गावातून समाजसेवेची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानने गेल्या १५ वर्षांपासून समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून सकारात्मक बदल घडविण्याचे कार्य सातत्याने केले आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक जनजागृती, राष्ट्रसेवा, आर्थिक स्वावलंबन तसेच कला-क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रम राबवत संस्थेने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. दोन वर्षांपूर्वी संस्थेची अधिकृत नोंदणी करून समाजोपयोगी कार्याला अधिक गती देण्यात आली असून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याची परंपराही संस्थेने जपली आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून किसान विद्या प्रसारक संस्थेच्या खजिनदार आशाताई रंधे, नगरसेविका सुलोचनाताई साळुंखे, शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष संगीताताई देवरे तसेच मनकर्णिका मोरे उपस्थित होत्या. मान्यवरांनी महिलांच्या कर्तृत्वाचे कौतुक करत आजच्या समाजात महिलांची भूमिका अधिक प्रभावी आणि प्रेरणादायी होत असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. एसपीडीएम महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापक रजनी नकुल लुंगसे यांचा महिलांसाठी समुपदेशन व मार्गदर्शन क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. श्रीराम डोळ्यांचे हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. राखी अग्रवाल यांचा गोरगरिबांना अल्पदरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल गौरव करण्यात आला.
तसेच कोडीद येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एम. एम. पावरा यांचा तालुक्यातील पहिल्या महिला पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल सन्मान करण्यात आला. आर. सी. पटेल महाविद्यालयाच्या प्राध्यापक डॉ. अनिता जाधव यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान, महिलांसाठी मार्गदर्शन तसेच सामाजिक प्रबोधनासाठी प्रकाशित साहित्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
सामान्य कुटुंबातून अत्यंत कष्टाने कुटुंबाची जबाबदारी पार पाडणाऱ्या आदर्श गृहिणी जिजाबाई पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. संघर्षातून स्वतःचा व्यवसाय उभारून महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण करणाऱ्या युवा उद्योजिका ममता सोनवणे यांचाही गौरव करण्यात आला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षिका पुनम पाटील यांचा शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच पुरुषांचे प्राबल्य असलेल्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील विद्युत सहाय्यक अश्विनी पंडित जाधव यांनी जबाबदारी सक्षमपणे पार पाडल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी शिरपूर शहर पोलीस ठाण्यातील दामिनी पथकातील कर्तव्यदक्ष महिला सदस्यांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला. शहरातील महिलांच्या सुरक्षेसाठी त्यांनी केलेल्या धाडसी व उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत त्यांना “रणरागिनी” म्हणून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे अध्यक्ष योगेश्वर मोरे यांनी केले, तर संस्थेच्या सदस्य मनीषा मोरे यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
या प्रसंगी मनीषा मोरे, मयुरी भामरे, निर्मला शिरसाठ, सीमा बुवा, स्वाती सूर्यवंशी, सिंधुबाई पाटील, निर्मला वाघ, सीमा पाटील, विशाखा पाटील, मनीषा पाटील, भाग्यश्री पाटील, ज्योती कोळी, कल्पना पाटील, प्रमिला मुडावदकर, मोनाली पाटील, स्मिता पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी वैशाली निकम, पुष्पा मोरे, छायाताई पाटील, लताबाई मोरे, शुभांगी मोरे, संस्थेचे खजिनदार मुरलीधर मोरे, वनक्षेत्रपाल भूषण पाटील, उपाध्यक्ष दिलीप पाटील, हेमकांत मोरे, सुभाष मोरे, चंद्रकांत मोरे, हॉटेल साईस्वादचे संचालक अरविंद राजपूत, भरत राजपूत, मोक्षद मोरे, प्रेम पाटील, गौरव पाटील तसेच पत्रकार बांधव आणि पंचायत समितीच्या भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ज्ञानदीप सेवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमातून समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांच्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला. महिला सन्मानाचा हा कार्यक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















