साक्री पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गणेशपुर गावात आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात घडला. प्रकाश मराठे यांच्या शेतात कांदा भरण्यासाठी आणलेला ट्रॅक्टर अचानक बिघाडामुळे सुमारे ५० फूट खोल विहिरीत कोसळला. या दुर्घटनेत ट्रॅक्टरवर बसलेल्या दोन मुलींचाही विहिरीत पडून बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
● कशामुळे घडला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, शेतातील विहिरीच्या काठावर ट्रॅक्टर उभा करून कांदा भरण्याचे काम सुरू होते. मात्र अचानक ट्रॅक्टर स्वतःच उत्तर दिशेने सरकत गेला आणि क्षणातच तो थेट विहिरीत कोसळला. ट्रॅक्टरवरील दोन मुली प्रतिक्षा मोहन मराठे (वय अंदाजे १४) आणि जान्हवी महेश मराठे (वय अंदाजे १०) या भावंडीसह वाहन खाली पाण्यात पडले.
● विहीर ५० फूट खोल – पाण्याने पूर्ण भरलेली
विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने मुलींचे अवशेष किंवा त्यांचा काहीही ठावठिकाणा लागत नसल्याचे प्राथमिक माहितीवरून कळते. गावकरी, स्थानिक तरुण आणि पोलिसांचा ताफा जागेवर दाखल झाला आहे.
● क्रेनच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू
गावकऱ्यांच्या मदतीने तातडीने क्रेन बोलावण्यात आली असून ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर दोन्ही मुलींचा शोध घेण्यासाठी सातत्याने शोधमोहीम सुरू असून पाण्याचा वेग आणि विहिरीची खोली पाहता कार्य कठीण ठरत आहे.
● घटनास्थळी मोठी गर्दी – वातावरणात भीतीचे सावट
अपघाताची बातमी पसरताच ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली असून परिसरातील वातावरणात भीतीचे व भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा सुरू केला असून अपघात कशामुळे घडला याबाबत तपास सुरू आहे.ही घटना संपूर्ण गणेशपुर व परिसरातील नागरिकांना हादरवून टाकणारी असून मुलींच्या सुरक्षिततेबाबत सर्वजण प्रार्थनारत आहेत.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















