शिरपुर प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर थाळनेर पोलिस ठाण्यातील दोन लाखांच्या लाचप्रकरणाने संपूर्ण पोलिस वर्तुळ हादरून गेले आहे. अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात अटक टाळून देण्याच्या बदल्यात तीन लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती दोन लाख रुपये स्वीकारताना थाळनेर पोलिस ठाण्यातील हवालदाराला Anti Corruption Bureau Maharashtra (एसीबी), धुळे पथकाने रंगेहात अटक केली. या प्रकरणात आणखी तीन पोलिस कर्मचाऱ्यांचा सहभाग उघड झाल्याने चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत श्रीकांत धीवरे, धुळे जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी तातडीने कठोर पावले उचलत थाळनेरचे प्रभारी अधिकारी शत्रुघ्न पाटील यांना निलंबित केले आहे. कर्मचाऱ्यांवर नियंत्रण न ठेवल्याचा ठपका ठेवत, लाच मागितल्याचा आरोप असलेल्या चौघा कर्मचाऱ्यांनाही तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
तक्रारदार हे मौजे महादेव दोंदवाडा, नागेश्वरपाडा (ता. शिरपूर) येथील रहिवासी असून त्यांच्या वडिलांविरोधात १८ ऑक्टोबर २०२३ रोजी थाळनेर पोलिस ठाण्यात अंमली पदार्थविरोधी कायद्याअंतर्गत विविध कलमान्वय गुन्हा दाखल होता
या प्रकरणात अटक टाळण्यासाठी थाळनेर पोलिस ठाण्याचे हवालदार भूषण रामोळे, कॉन्स्टेबल धनराज मालचे, किरण सोनवणे व मुकेश पावरा यांनी तीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. अखेर दोन लाखांवर तडजोड झाली.
मात्र लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने थेट धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली. सोमवारी सापळा रचण्यात आला. शिरपूर शहर पोलिस ठाणे हद्दीतील करवंद नाक्यावर कॉन्स्टेबल मुकेश पावरा याने दोन लाखांची लाच स्वीकारताच एसीबीने त्याला रंगेहात अटक केली. अन्य तीन संशयित पथक येताच पसार झाले. त्यानंतर चौघांविरोधात शिरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
“कायद्यापुढे सर्व समान” — एसपींचा स्पष्ट संदेश
एकाच वेळी चार पोलिस कर्मचाऱ्यांवर लाचप्रकरणी कारवाई झाल्याने पोलिस दलावर टीकेची झोड उठली होती. मात्र जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी कोणतीही तडजोड न करता कठोर निर्णय घेतला.
थाळनेर प्रभारी शत्रुघ्न पाटील यांच्यावर स्लॅक सुपरव्हिजन व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण न ठेवल्याचा ठपका ठेवत त्यांना १२ जानेवारीपासून शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना मुख्यालयात हजर राहण्याचे तसेच दर शुक्रवारी परेडच्या दिवशी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सा पोलीस निरीक्षक श्री हेमंत निंबा निंबा पाटील नवे प्रभारी
दरम्यान, थाळनेर पोलिस ठाण्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी शिरपूर येथील हेमंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
या संपूर्ण कारवाईमुळे “पोलिस दलात शिस्त आणि पारदर्शकता अबाधित ठेवली जाईल” असा स्पष्ट संदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आला असून, थाळनेर लाचप्रकरणाची चर्चा जिल्हाभर सुरू आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















