शिरपूर तालुक्यातील हाडाखेड चेकपोस्ट (सांगवी) येथे सांगवी पोलिस व अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला राजश्री पान मसाला, गुटखा व तंबाखूचा तब्बल 19 लाख 19 हजार रुपयांचा साठा जप्त केला. याच आठवड्यात गुटखा तस्करीविरोधात ही दुसऱ्यांदा मोठी कारवाई झाल्याने तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी MP-07 GB-1618 क्रमांकाचे आयशर वाहन हाडाखेड चेकपोस्टवर अडवून तपासणी केली. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा केल्यानंतर वाहनातून महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला राजश्री पान मसाला, गुटखा व तंबाखूचा मोठा साठा आढळून आला.
तपासणीत वाहनातून 11,600 पॅकेट प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याचा साठा हस्तगत करण्यात आला असून त्याची अंदाजे किंमत रु. 19,19,000 असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रकरणी वाहन चालक संजयकुमार किशोरीलाल गुप्ता (रा. रेती फाटक, लोहामंडी, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही संयुक्त कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त मंगेश माने (नाशिक), सहाय्यक आयुक्त (अन्न) गोपाल माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत राणे, अरविंद राऊत, मंगेश भावसार (अन्न व औषध प्रशासन, धुळे) तसेच सांगवी पोलीस ठाण्याचे जयपाल हिरे पीएसआय हेमंत खैरनार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















