गोयल ट्रेडिंग कंपनीवर सर्वेक्षण; 100 कोटींहून अधिक खरेदीत टीडीएस/टीसीएस अनियमितता उघड
धुळे व जळगाव येथील आयकर विभागाच्या टीडीएस पथकांनी आयकर आयुक्त टीडीएस रेंज नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर येथे गोयल ट्रेडिंग कंपनीच्या कार्यालयावर 23 जानेवारी 2026 रोजी सर्वेक्षण करून कारवाई केली. यासंदर्भात नाशिक आयकर उपायुक्त सदानंद आर. कसलू यांनी माहिती दिली आहे.
आयकर विभागाच्या तपासात असे निदर्शनास आले की, आर्थिक वर्ष 2021-22 ते 2023-24 या कालावधीत गोयल ट्रेडिंग कंपनीने 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीची खते, बियाणे व कीटकनाशके खरेदी केली होती. मात्र, आयकर कायद्यातील तरतुदीनुसार आवश्यक असलेला टीडीएस/टीसीएस कापला गेला नाही तसेच तो सरकारी खात्यात जमा करण्यातही आला नव्हता.
ही अनियमितता गंभीर मानून आयकर विभागाच्या टीडीएस अधिकाऱ्यांनी आस्थापनेची सखोल चौकशी केली. तपासादरम्यान वजावट करणाऱ्याकडून थकित कराची रक्कम अखेर जमा करण्यात आली, अशी माहिती विभागाने दिली आहे.
दरम्यान आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की, एकदा टीडीएस कपात झाली की तो ‘सरकारी पैसा’ बनतो आणि त्याचा गैरवापर किंवा विलंब कोणीही करू नये. कंपन्या, ट्रस्ट, सोसायट्या व इतर संस्थांनी वेळेवर टीडीएस भरणा करावा, तसेच टीडीएस/टीसीएस रिटर्न दाखल करून फॉर्म 26AS व AIS शी नियमित जुळवणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जाणूनबुजून थकबाकी ठेवल्यास व्याज, मोठा दंड आणि आयकर कायदा 1961 नुसार खटल्यासारखी कठोर कारवाई होऊ शकते, असा इशारा देत सर्व संबंधितांनी टीडीएस/टीसीएस तरतुदींचे काटेकोर पालन करावे व वेळेत कर कपात करून जमा करावा, असे नाशिक आयकर उपायुक्त श्री. कसलू यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















