शिरपूर पळासनेर अंधश्रद्धेच्या आमिषातून सुरू झालेला प्रकार थेट गोळीबार, गंभीर गुन्हे आणि राजकीय नेत्याच्या अटकेपर्यंत पोहोचल्याने धुळे जिल्हा व मध्यप्रदेशातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एका वर्षापूर्वी शिरपूर तालुक्यातील दुर्गम जंगल भागात घडलेल्या गोळीबार प्रकरणात काँग्रेस नेते व मध्यप्रदेशचे माजी मंत्री हिरालाल सिलावट यांचा मुलगा आणि काँग्रेस पक्षाचे माजी युथ काँग्रेस प्रदेश महासचिव यशवंत सिलावट यांना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे आमिष
सुमारे एक वर्षापूर्वी शिरपूर तालुक्यातील सलाईपाडा परिसरातील जंगलात ‘मांत्रिक पैशांचा पाऊस पाडतो’ अशी अफवा पसरली होती. या अंधश्रद्धेच्या जाळ्यात अडकून बऱ्हाणपूर (मध्यप्रदेश) येथील गणेश रामदास चौरे (वय ३०) व त्याच्या सहकाऱ्यांनी कथित मांत्रिक गुलजारसिंग पारसिंग पावरा (वय ५७) याच्याशी संपर्क साधला.
पैशांचा पाऊस पाडण्यासाठी विधी करण्यासाठी दीड लाख रुपये देण्याचा सौदा ठरला आणि जंगलातील निर्जन भागात हा विधी करण्यात आला.मात्र विधी पूर्ण होऊनही काहीच ‘चमत्कार’ न घडल्याने संशय आणि वाद निर्माण झाला. पैसे परत मागितल्यावर गुलजारसिंगने केवळ ५० हजार रुपये परत देण्याची तयारी दर्शवली. यावरून वाद चिघळत गेला.
वादाचे रूपांतर थेट गोळीबारात
वाद विकोपाला गेल्यानंतर गुलजारसिंग पावरा व त्याचा सहकारी शिवा पावरा यांना मारहाण करण्यात आली. याचवेळी गोळीबार करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या घटनेत गुलजारसिंग पावरा व शिवा पावरा गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले.घटनेनंतर हल्लेखोर जंगलात पसार झाले. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती.
शिरपूर पोलिसांचा मोठा तपास
जखमी गुलजारसिंग पावरा यांच्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासासाठी विशेष पथक तयार करण्यात आले.शिरपूर पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन बऱ्हाणपूर व खंडवा येथून गणेश चौरे, रतीलाल गणपत तायडे (वय ५०), अंकित अनिल तिवारी (वय २५) आणि विशाल करणसिंग कश्यप (वय ३९) यांना अटक केली.दरम्यान, पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गुलजारसिंग पावरा व शिवा पावरा यांच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हाही दाखल करण्यात आला होता.
आंदोलनात असतानाच अटक
या प्रकरणाच्या तपासात यशवंत सिलावट यांचे नाव समोर आले. रविवारी दुपारी मध्यप्रदेशातील खंडवा येथे काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारविरोधात आयोजित केलेल्या आंदोलनात यशवंत सिलावट सहभागी झाले होते.
मनरेगा योजनेच्या नावबदलाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यानच महाराष्ट्र पोलिसांनी खंडवा कोतवाली पोलिसांच्या मदतीने थेट आंदोलनस्थळावरूनच यशवंत सिलावट यांना ताब्यात घेतले.त्यानंतर त्यांना खंडवा कोतवाली पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीअंती धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी त्यांना अधिकृत अटक केली.
न्यायालयीन कारवाई व राजकीय खळबळ
यशवंत सिलावट यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अंधश्रद्धा, फसवणूक आणि गोळीबारासारख्या गंभीर गुन्ह्यांशी संबंधित हे प्रकरण असल्याने पुढील तपासात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.एका कथित मांत्रिक विधीतून सुरू झालेला हा प्रकार थेट राजकीय नेत्याच्या अटकेपर्यंत पोहोचल्याने धुळे, शिरपूरसह मध्यप्रदेशातील राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















