शिरपूर (प्रतिनिधी) : शहर बसस्थानकात प्रवाशांची गर्दी… बसमध्ये चढण्याची लगबग… आणि त्याच संधीचा फायदा घेत एका चोरट्याने थेट खिशातून ५० हजारांचा रोख लंपास केला! मात्र चोराला वाटलं असेल आपण निसटून जाऊ… पण शिरपूर शहर पोलिसांच्या डी.बी. पथकाने अवघ्या ४ तासांतच हातचलाखीचा चोर पकडून त्याचा डाव उधळून लावला आहे. विशेष म्हणजे चोरीला गेलेला संपूर्ण ५० हजारांचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे.
दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता शिरपूर बसस्थानकात शिरपूर–छत्रपती संभाजीनगर बसमध्ये चढताना प्रवाशांच्या गर्दीतून हा प्रकार घडला. याबाबत किशोर मोरे (रा. कुरखळी) यांनी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तात्काळ फिर्याद दाखल केली.
फिर्याद नोंद होताच पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला. दरम्यान, गोपनीय माहितीच्या आधारे डी.बी. पथकाने खंडेराव मंदिर परिसरातून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत तो चोर असल्याचे निष्पन्न झाले.
संशयिताने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून ५०० रुपयांच्या १०० नोटा असा ५० हजार रुपयांचा रोख जप्त करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव राजू पोपट सैंदाणे (वय ६२, रा. वाघाडी) असे आहे.अवघ्या काही तासांत चोरीचा छडा लावून मुद्देमाल हस्तगत केल्याने डी.बी. पथकाची जोरदार चर्चा असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. पुढील तपास पोहेकॉ चेतन सोनवणे करीत आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्यासह डी. बी. पथकाचे पोहेकॉ राजेंद्र रोकडे, अनिल जाधव, रविंद्र आखडमल, चेतन सोनवणे, पोकॉ योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, भटू साळुंके, सोमा ठाकरे, प्रशांत पवार, मनोज महाजन, मनोज दाभाडे, सचिन वाघ व आरिफ तडवी यांच्या पथकाने केली

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















