शिरपूर, : गांजाची विक्री करण्यासाठी पॅकिंग सुरू असतानाच सांगवी पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी असलेल्या तिघांनी पळ काढला. विशेष म्हणजे, पसार झालेल्यांमध्ये मध्य प्रदेशातील एका गावच्या सरपंचाचा समावेश असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ओला व सुका गांजा, एक दुचाकी आणि तीन मोबाईल फोन असा एकूण १४ लाख ३९ हजार १० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या जामन्यापाणी परिसरातील वनजमिनीवर गांजाची लागवड करून त्याची विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ५ नोव्हेंबर रोजी दुपारी पावणेपाचच्या सुमारास उपनिरीक्षक हेमंत खैरनार व उपनिरीक्षक कचरे यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला.
यावेळी घटनास्थळी तीन व्यक्ती गांजाचे पॅकिंग करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मात्र, पोलिसांना पाहताच तिघांनीही घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी त्यांचा काही अंतरापर्यंत पाठलाग केला; परंतु दुर्गम डोंगराळ भागाचा फायदा घेत संशयित पसार होण्यात यशस्वी झाले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाची कसून तपासणी केली असता ओला व सुका गांजा, एक दुचाकी आणि तीन मोबाईल फोन असा मुद्देमाल आढळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणात रेवा किसन बारेला (पावरा, रा. फलिया दुगानी, जि. बडवानी, मध्य प्रदेश) याचे नाव प्रमुख संशयित म्हणून समोर आले आहे. तो फलिया दुगानी गावचा सरपंच असल्याची माहिती आहे. त्याच्यासह अन्य दोन साथीदारांविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पसार संशयितांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















