प्रतिनिधी धुळे
‘ धुळे सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत धुळे जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत अहमदाबादहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसमधून तब्बल १,८५४ किलो मावा (खवा) जप्त केला. या माव्याची अंदाजे किंमत ५ लाख ८० हजार ५०० रुपये असून, भेसळीच्या संशयावरून विविध पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार, साक्री रोडवरील विद्यावर्धिनी कॉलेजसमोर अहमदाबादहून येणारी टाटा कंपनीची धन बाबा दीपसिंगजी पंजाब लक्झरी बस (क्र. एआर-०१ क्यू-४२४२) थांबवून तपासणी करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या तपासणीत बसमध्ये मिठाई तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या माव्याचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला. पुढील तपासणी व कारवाईसाठी वाहन टोल नाक्याजवळील दिसान कोल्ड स्टोरेज येथे नेण्यात आले.
तपासणीदरम्यान स्वीट हलवा (खोडल), बल्क स्वीट (खोडल), श्री गोवर्धन गोल्ड स्वीट, कृष्णा हलवा, डेलिस डी लाईट, श्री गोवर्धन गोल्ड हलवा, जेवण स्पेशल इंडियन स्वीट (वत्सल), ब्रिजवासी स्वीट हलवा यासह विविध अन्नपदार्थांचे नमुने घेण्यात आले.
भेसळीचा संशय असल्याने १,८५४ किलो मावा, किंमत ५,८०,५०० रुपये, जप्त करून दिसान कोल्ड स्टोरेजमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे. जप्त केलेले नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
या प्रकरणात वाहनचालक सुलेमान उमरभाई मोदन आणि क्लिनर अल्ताब, दोघेही अहमदाबाद, गुजरात येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई सहआयुक्त मंगेश माने, सहाय्यक आयुक्त गो. वी. माहोरे, आनंद पवार, अन्न सुरक्षा अधिकारी शशिकांत राणे, अरविंद राऊत आणि मंगेश भावसार यांच्या पथकाने केली.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















