शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी कार अडवून चालकासह त्याच्या साथीदाराला लोखंडी पाईप व अन्य टणक हत्याराने मारहाण केली. त्यानंतर दोघांना वेगवेगळ्या वाहनांत डांबून त्यांचे अपहरण करत रोकड व मोबाईल लुटून दरोडेखोर पसार झाले. या घटनेने धुळे जिल्ह्यासह शिरपूर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
महामार्गावर कार अडवून टाकला दरोडा
शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० ते १२.४५ वाजेच्या दरम्यान मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळील परिसरात ही घटना घडली. फिर्यादी सुनील शिवरामभाई पटेल हे कारमधून प्रवास करीत असताना अज्ञात दरोडेखोरांनी एका वाहनाने त्यांच्या कारचा पाठलाग केला. त्यानंतर ओव्हरटेक करून कारसमोर वाहन आडवे लावत रस्ता अडवला.
लोखंडी पाईपने काचा फोडून मारहाण
दरोडेखोरांनी कारच्या पुढील दरवाजाची काच लोखंडी पाईपने फोडून दरवाजा उघडला. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या साथीदाराला तोंडाला पट्टी बांधून हाताबुक्क्यांनी तसेच टणक हत्याराने चेहऱ्यावर व डोक्यावर मारहाण केली. दोघांना दुखापत करून वेगवेगळ्या वाहनांत डांबण्यात आले. त्यानंतर त्यांचे अपहरण करून अज्ञातस्थळी नेण्यात आले.
३ कोटी ६ लाखांचा मुद्देमाल लंपास
दरोडेखोरांनी कारमधील बॅगेत ठेवलेली ३ कोटी ६ लाख रुपयांची रोख रक्कम लुटली. यामध्ये ५००, २०० व १०० रुपयांच्या नोटांचा समावेश होता. तसेच सुमारे १० हजार रुपये किमतीचा रेडमी कंपनीचा मोबाईल आणि इतर साहित्यही लुटण्यात आले. एकूण ३ कोटी ६ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याची फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
शिरपूर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात पाच ते सहा आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक कचरेंकडे सोपविण्यात आल्याचे नोंदीत नमूद आहे. या गंभीर घटनेमुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महामार्गावर एवढ्या मोठ्या रकमेचा दरोडा पडल्याने पोलिसांसमोर आरोपींचा शोध घेण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















