धुळे | प्रतिनिधी
पशुखाद्याच्या गोण्यांच्या आड विदेशी दारूचा मोठा साठा लपवून त्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर धुळे स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) धडाकेबाज कारवाई केली. मुंबई-आग्रा महामार्गावरील अवधान चौफुली येथे रचलेल्या सापळ्यात कंटेनर पकडण्यात आला असून, विदेशी दारूसह कंटेनर व पशुखाद्य असा तब्बल २० लाख ५० हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी धुळे जिल्ह्यातील अवैध दारू निर्मिती व बेकायदेशीर वाहतुकीविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना १ ऑक्टोबर रोजी गोपनीय माहिती मिळाली की, नाशिकहून धुळ्याकडे येणाऱ्या एमएच १४ जीयू ५५५३ क्रमांकाच्या कंटेनरमध्ये विदेशी दारूचा साठा लपवून नेण्यात येत आहे.
माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्ग क्रमांक ३ वरील अवधान चौफुली येथे सापळा रचला. अवधान टोलनाक्याकडून धुळ्याच्या दिशेने येणारा संशयित कंटेनर दिसताच पोलिसांनी तो थांबवून झडती घेतली. सुरुवातीला कंटेनरमध्ये पशुखाद्याच्या गोण्या दिसत असल्या तरी पोलिसांनी बारकाईने तपासणी केली असता पशुखाद्याच्या आड विदेशी दारूचे बॉक्स लपवून ठेवण्यात आल्याचे उघड झाले.
लाखोंची दारू, कंटेनरसह मोठा मुद्देमाल जप्त
कारवाईत अशोक लेलँड गुरु कंटेनरची किंमत १० लाख रुपये, पशुखाद्याच्या ५० गोण्या किंमत ५० हजार रुपये, तसेच विविध कंपन्यांची विदेशी दारू असा मोठा साठा जप्त करण्यात आला.
जप्त दारूमध्ये डॅमन अँड ड्यू, रॉयल चॅलेंज, डीएसपी ब्लॅक क्लासिक व्हिस्की, सिग्राम्स ब्लेंडर्स प्राईड रेअर प्रीमियम व्हिस्की, मास्टर ब्लेंडर्स सिग्नेचर रेअर एज्ड व्हिस्की आणि मॅजिक मोमेंट्स फ्लेवर्ड व्होडका यांचा समावेश आहे.
चौघांची नावे समोर
कंटेनरमध्ये चालक विजय सुरेश ठाणगे (४२) आणि क्लिनर इसाक नूर शेख (३६), दोघे रा. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर आढळून आले. पोलिसांच्या चौकशीत विशाल सुरेश ठाणगे, रा. श्रीरामपूर याने दारूचा साठा भरून दिल्याचे, तर तो बापू वाणी उर्फ विनोद वसंत देशमुख, रा. चोपडा, जि. जळगाव यांच्याकडे घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३३४/२०२६ दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम विविध अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एलसीबीच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी
पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि दीपक ढोके, पोलीस अंमलदार शिरीष भदाणे, सदेसिंग चव्हाण, संदीप पाटील, सतीश जाधव, मच्छिंद्र पाटील, जितेंद्र अहिरराव, महेंद्र सपकाळ, अतुल निकम आणि राजीव गिते सदरची कारवाई यांनी केली

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















