धुळे जळगाव येथील जैव-खते, सूक्ष्म पोषक घटक, जैव-उत्तेजक व कीटकनाशके उत्पादन व्यवसाय करणाऱ्या एका नामांकित आस्थापनेवर आयकर विभागाने धडक कारवाई करत आर्थिक अनियमिततेचा पर्दाफाश केला आहे. नाशिक व जळगाव येथील आयकर टीडीएस पथकांनी आयकर आयुक्त (टीडीएस रेंज, नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार, दि. 22 जानेवारी 2026 रोजी संबंधित आस्थापनेच्या कार्यालयात अचानक तपासणी करत महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली.
टीडीएस कापला; पण सरकारकडे जमा नाही!
तपासणीदरम्यान चालू आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये कंपनीने मोठ्या प्रमाणात जैव-खते, सूक्ष्म पोषक घटक, जैव-उत्तेजक व कीटकनाशकांची खरेदी-विक्री केल्याचे स्पष्ट झाले. व्यवहारांवर नियमानुसार टीडीएस कापण्यात आला होता; मात्र कापलेला टीडीएस व टीसीएस केंद्र सरकारच्या खात्यात वेळेवर जमा करण्यात आलेला नसल्याचे उघड झाले. ही बाब गंभीर मानून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाईचा बडगा उगारला.
५० लाखांहून अधिक रक्कम तात्काळ वसूल
तपासाअंती संबंधित आस्थापनेकडून थकबाकीपैकी तब्बल 1 कोटी 2 लाख रुपये थकीत असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी 50 लाखांहून अधिक रक्कम तात्काळ केंद्र सरकारच्या खात्यात जमा करून घेण्यात आयकर विभागाला यश आले. कंपनीच्या संचालकांनी उर्वरित रक्कम लवकरात लवकर भरण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
टीडीएस म्हणजे सरकारी पैसा – गैरवापर खपवून घेतला जाणार नाही
या कारवाईबाबत माहिती देताना जळगाव आयकर अधिकारी श्री. मनु भारद्वाज यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“एकदा टीडीएस कापला की तो ‘सरकारी पैसा’ बनतो. त्या रकमेचा गैरवापर किंवा विलंब कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.”
त्यांनी कंपन्या, ट्रस्ट, सोसायट्या व इतर संस्थांना वेळेवर टीडीएस/टीसीएस भरणा करण्याचे, तसेच फॉर्म 26AS व AIS शी नियमित जुळवणी करण्याचे आवाहन केले.
जाणूनबुजून थकबाकी ठेवल्यास कठोर कारवाईचा इशारा
आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की, जाणूनबुजून टीडीएस/टीसीएस न भरल्यास संबंधितांवर व्याज, मोठा आर्थिक दंड तसेच आयकर कायदा 1961 अंतर्गत फौजदारी खटल्यासारखी कठोर कारवाई केली जाईल. त्यामुळे सर्व संबंधितांनी नियमांचे काटेकोर पालन करून वेळेवर कर भरणा करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
करचुकवेगिरीविरोधात मोहीम अधिक तीव्र
दरम्यान, करचुकवेगिरीविरोधात आयकर विभागाने राज्यभरात तपास व कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून, भविष्यातही अशा प्रकारच्या अनियमितता आढळल्यास कडक पावले उचलण्यात येणार असल्याचे संकेत विभागाने दिले आहेत.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















