शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर शहर पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्याचा अवघ्या सहा दिवसांत छडा लावत दोन सराईत चोरट्यांना अटक करून चोरीस गेलेले ₹१ लाख ४० हजार किमतीचे पिकअप (छोटा हत्ती) वाहन हस्तगत करण्यात उल्लेखनीय यश मिळविले आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे वाहनचोरांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.दि. २४ मे २०२६ रोजी जळोद येथील आश्रमशाळेच्या आवारातून शाळेच्या धान्य वाहतुकीसाठी वापरले जाणारे MH-15/CK-4882 क्रमांकाचे पिकअप वाहन अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचा तपास सुरू असताना शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढत संगम गंगाराम सोनवणे (भिल) व अनिल खेमराज भिल (भवरे) या दोघांना ताब्यात घेतले.पोलिसी चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या सांगण्यावरून विखरण गावाजवळील एका पत्र्याच्या शेडमध्ये लपवून ठेवलेले चोरीचे वाहन पोलिसांनी जप्त केले. या कारवाईत ₹१.४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपास ठरला निर्णायक घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीचे अचूक संकलन यामुळे हा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले. शोध पथकाच्या अथक परिश्रमांमुळे वाहनचोरीच्या या प्रकरणाचा यशस्वी उलगडा झाला.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी मोहीम सदर कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे तथा उपविभागीय पोलीस अधिकारी (शिरपूर) विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या मोहिमेत पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी (प्रभारी अधिकारी, शिरपूर शहर पोलीस ठाणे) आणि पोलीस निरीक्षक जयपाल हिरे (तात्पुरता प्रभार) यांच्या नेतृत्वाखालील शोध पथकाने मोलाची भूमिका बजावली.शोध पथकात पोलीस अंमलदार रविंद्र अखडमल, अतुल पाटील, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, सोमा ठाकरे, आरीफ तडवी, सचिन वाघ, विनोद अखडमल, गोविंद कोळी, मनोज महाजन, भटू साळुंखे आणि प्रशांत पवार यांचा समावेश होता.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.




















