शिरपूर :मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात डॉल्बी सिस्टीम व लेझर लाईट वापरण्यास सक्त मनाई केली असून, त्याबाबत पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे यांनी देखील धुळे जिल्ह्यात कठोर अंमलबजावणीसाठी आदेश जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर शिरपूर शहर पोलीस स्टेशनने नागरिकांना जाहिर आवाहन केले आहे.
गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सणांच्या काळात विविध सार्वजनिक मंडळांकडून मिरवणुका काढल्या जातात. या मिरवणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर डॉल्बी सिस्टीम आणि लेझर लाईटचा वापर होत असल्याचे समोर आले आहे. अशा साधनांमुळे वयोवृद्ध नागरिक, लहान मुले तसेच सर्वसामान्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. कान, डोळे व छातीवर ताण येऊन कायमस्वरूपी अपंगत्व अथवा जीवाला धोका निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे नोंदली गेली आहेत.
शिरपूर शहर पोलीस स्टेशनकडून यापूर्वीच अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. यावर्षीच्या गणेशोत्सव काळात पोलिसांनी दोन बॅण्ड व तीन डीजेवर कारवाई केली आहे. तर यापूर्वीही विविध सण-उत्सवाच्या काळात आठ डीजेवर कारवाई झाल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले.
पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारच्या अवैध डॉल्बी सिस्टीम किंवा लेझर लाईटचा वापर पुढेही आढळल्यास संबंधित मंडळ, बॅण्ड किंवा डीजे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
शिरपूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “सण-उत्सव आनंदाने साजरा करा, परंतु डॉल्बी व लेझर लाईट वापरून मानवी जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करू नये. कायद्याचे पालन करणे हेच सर्वांच्या हिताचे आहे.”

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















