नवापूर प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर एमआयडीसी परिसरात गुप्तपणे सुरू असलेल्या बनावट तूप निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत तब्बल १ कोटी ४६ लाख ५६ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळयुक्त तूपाच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ मार्च २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की नवापूर एमआयडीसी परिसरात एका कारखान्यात मोठ्या प्रमाणावर बनावट तूप तयार करून ते बाजारात विक्रीसाठी पाठवले जात आहे. या माहितीची खातरजमा करत एलसीबीच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांसह पंचांच्या उपस्थितीत संबंधित कारखान्यावर छापा टाकला.
छाप्यादरम्यान राकेशभाई ईश्वरभाई भरतिया (वय ४७, रा. सुरत, गुजरात) हा इसम कारखान्यात आढळून आला. तपासणीदरम्यान कारखान्यात पाम तेल, वनस्पती तूप, विविध रासायनिक पदार्थ व फ्लेवर यांच्या मिश्रणातून गायीच्या तुपासारखा रंग आणि सुगंध निर्माण करून मोठ्या प्रमाणावर बनावट तूप तयार केले जात असल्याचे उघड झाले.
तयार केलेले हे बनावट तूप ORIA COW GHEE, SHUBH PREMIUM COW GHEE, LABII COW GHEE, RADHE KRISHNA COW GHEE अशा विविध नामांकित ब्रँडच्या नावाने पॅक करून बाजारात विक्रीसाठी पाठवले जात असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी पाम तेल, बनावट तुपाने भरलेले डबे, विविध क्षमतेच्या स्टोरेज टाक्या, पॅकिंग मशीन, प्रिंटिंग मशीन, बॉयलर, इलेक्ट्रिक मोटर्स, गॅस सिलिंडर, रासायनिक फ्लेव्हर, Beta-Carotene तसेच इतर साहित्य असा एकूण १,४६,५६,३७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी आरोपी राकेशभाई ईश्वरभाई भरतिया याच्याकडे पामतेल व तूप निर्मितीचा कोणताही अधिकृत परवाना नसताना भेसळयुक्त रसायनांचा वापर करून मानवी आरोग्यास हानिकारक तूप तयार केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. आणि अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि विकास गुंजाळ, पोहेकॉ मुकेश तावडे, मनोज नाईक, दादाभाई वाघ, विशाल नागरे, रमेश साळुंखे, सचिन वसावे तसेच पोको अभय राजपूत, रामेश्वर चव्हाण यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
या कारवाईमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थ तयार करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना मोठा धडा मिळाला असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कारवायांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई सुरू ठेवणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















